पुणे : श्री क्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर पूर्णत्वास येत आहे. या अनुषंगाने पुण्यात रामलल्लांसाठी एक अद्भूत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १० ते २२ डिसेंबर २०२३ या काळात, देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लाखो लोक पुण्यात येऊन, पंचवीस हातमागांवर प्रभू श्री रामांसाठी वस्त्र विणणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ श्रीराम मंदिर जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, रा. स्व. संघाचे माजी सहसरकार्यवाह भय्याजी जोशी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या सह चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी प्रभू श्रीरामांसाठी दोन धागे विणण्याची सेवा केली.अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा हा कार्यक्रम पुण्यात केला जात आहे. पुण्यातील गुडलक चौकात हे धागे विणण्याचे आवाहन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी स्मृती इराणी यांनी स्वतः प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीसाठी वस्त्रही विणलं.