कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशन कोल्हापूर यांच्या विद्यमाने आयोजित अखिल महाराष्ट्र अशासकीय महाविद्यालय प्राचार्य महासंघाच्या 39 व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाचा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या दोन अधिवेशनात नवीन शैक्षणिक धोरणातील आव्हाने आणि संधी या विषयावर चर्चा होणार आहे. याप्रसंगी पाटील यांनी अधिवेशनाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही केले.
नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना प्राचार्यांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच प्राचार्यांचे प्रश्न लवकरच मार्गस्थ केले जातील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. जगभरातून भारताकडे कुशल मनुष्यबळाची मागणी होत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा देखील याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाबरोबरच रोजगार निर्मिती आणि कौशल्य निर्मिती या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे. लवकरच याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील अशी आशाही याप्रसंगी पाटील यांनी व्यक्त केली.
राज्यभरातील अकरा विद्यापीठांशी संलग्न 400 हून अधिक प्राचार्य या अधिवेशनासाठी उपस्थित आहेत. यावेळी प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांच्यासह विविध प्राचार्य आणि शिक्षण संस्था प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य चंद्रकांत दळवी, विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्यासह विविध शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी आणि प्राचार्य उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.