‘प्रेमाची न्याहारी’ उपक्रमाच्या माध्यमातून कष्टकरी बांधवांची सेवा करण्याची संधी मिळाली हे मनाला वेगळेच समाधान देणारे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

6
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कोथरूडमध्ये आजपासून ‘प्रेमाची न्याहारी’ उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद लाभला. त्यामुळे ‘प्रेमाची न्याहारी’ उपक्रमाच्या माध्यमातून कष्टकरी बांधवांची सेवा करण्याची संधी मिळाली हे मनाला वेगळेच समाधान देणारे असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
पाटील यांनीं सांगितले कि, स्वामी विवेकानंद म्हणतात, “जीवनात आनंद शोधताना खरा आनंद कष्टाचा असतो.” आपली समाजव्यवस्था अबाधित रहावी म्हणून ऊन, पाऊस, थंडी, वादळी वारा याचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारे हे हात आपल्या समाजाचे विश्वकर्मा आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात हे विश्वकर्मा अनेकदा सकाळी उठल्यावर वेळेअभावी घोटभर पाणी पिऊन उपाशीपोटी कामाला सुरुवात करतात. पाटील पुढे म्हणाले कि, मी स्वतः एका गिरणी कामगाराचा मुलगा असल्याने; माझ्या आई-वडिलांनी आमचे पालनपोषण करताना कशाप्रकारे पोटाला तोशीश सहन केली, हे लहानपणापासून अनुभवले आहे. त्यामुळे त्यांची ही अडचण दूर व्हावी यासाठी कोथरुडमध्ये आजपासून ‘प्रेमाची न्याहारी’ उपक्रम सुरू करताना प्रचंड आनंद होत आहे.
वास्तविक, दुसऱ्याचे दुःख आपल्या हृदयात सामील करून त्याच्यावर उपाय शोधत राहिलो; तर आपल्या आनंदाला एक वेगळाच साज चढतो, असे मला नेहमी वाटते, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. त्यामुळे ‘प्रेमाची न्याहारी’ उपक्रमाच्या माध्यमातून कष्टकरी बांधवांची सेवा करण्याची संधी मिळाली हे मनाला वेगळेच समाधान देणारे असल्याचे त्यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.