प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून वितरण

69

उत्तर प्रदेश, वाराणसी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एप्रिल 2024 ते जुलै 2024 च्या  17 व्या हप्त्याचे वितरण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी, उत्तर प्रदेश येथून करण्यात आले.

देशातील शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला रु. 2000/- प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात रू. 6000/- प्रती वर्षी लाभ दिला जातो.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिवर्षी पुढील वेळापत्रकानुसार पात्र शेतकरी कुटुंबाच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) निधी जमा करण्यात येत आहे. पहिला हप्ता माहे डिसेंबर ते मार्च रु 2000, दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै रु.2000, तिसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर रु.2000 असा असेल. राज्यात पी.एम.किसान योजनेच्या एकूण 16 हप्त्यांमध्ये शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकुण रु 29630.24 कोटी रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

देशातील एकूण 9.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20 हजार कोटी रक्कम वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये राज्यातील एकूण 90.48 लाख लाभार्थींना रक्कम रू. 1845.17 कोटी वितरीत होणार आहेत, खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पिकाचे सुधारित बियाणे, खते घेणे, पेरणी करणे इत्यादी शेती कामासाठी या निधीचा निश्चित चांगला उपयोग होणार आहे .

Get real time updates directly on you device, subscribe now.