किल्ले रायगडावर आमदार भरत गोगावले यांनी केला महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
महाड : आज किल्ले रायगड येथे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी जगदीश्वराचे आणि शिरकाई देवीचे विधिवत पूजन करून छत्रपती शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येऊदे आणि रायगडसह महाराष्ट्रात महायुतीचे सर्व आमदार निवडून येऊ दे, तसेच अतिवृष्टी थांबून शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना दिलासा मिळू दे असे साकडे यावेळी गोगावले यांनी जगदीश्वराला, शिरकाई देवीला घातले.
भरत गोगावले यांनी आज श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना गोगावले म्हणाले आज श्रावणाचा पहिलाच सोमवार हा ७१ वर्षांनंतर आलेला हा सुवर्ण योग आहे म्हणून प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आजचा दिवस आम्ही निवडला. महायुतीचा कारभार जो आत्तापर्यंत चांगला चालला आहे तोच पुढे चालवण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीच्या सर्व आमदारांना निवडून द्यावं हि आमची रायगडावरून केलेली प्रार्थना आहे, असे गोगावले यावेळी म्हणाले.
गोगावले पुढे म्हणाले ,अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. शंभू महादेवाजवळ आमची प्रार्थना आहे कि हा जो महाप्रलय आहे तो आता थांबवावा. तसेच रायगड जिल्ह्यामधले आमच्या महायुतीचे सात आमदार निवडून यावेत,असे गाऱ्हाणे यावेळी गोगावले यांनी घातले.
यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे, भाजप, रिपाई तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख, महिला आघाडी, युवासेना, मुंबई मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, तसेच गोगावले यांचे कुटुंबीय उपस्थित होते.