चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने शब्दमहर्षींच स्मारक लवकरच साकारणार
पुणे : गजानन दिगंबर माडगूळकर. म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके गदिमा. कविता, गाणी, पटकथालेखन, संवादलेखन अशा चतुरस्त्र प्रतिभेचे धनी. त्यांच्या शब्दातून साकारलेले आणि बाबूजींच्या स्वर तसेच सुरांनी सजलेले गीतरामायण म्हणजे प्रतिभेचा सर्वोत्तम अविष्कार. गीत रामायण हा मराठी सांस्कृतिक विश्वातला अनमोल हिरा आहे आणि हा हिरा घडवला तो गदिमांनी… मराठी रसिकांना तृप्त करणाऱ्या या शब्दमर्षीचे महात्म्य महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांना कळणे महत्त्वाचे आहे. याच विचारातून गदिमांच्या स्मृती जागवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने २०१७ मध्ये त्यांचे स्मारक उभारण्याचे ठरवले. या स्मारकाचे काम उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने लवकरच पूर्णत्वास येणार आहे.
माजी खासदार स्व. गिरीशभाऊ बापट यांनी स्मारकासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. या स्मारकासाठी ९३१ चौरस मीटर जागाही उपलब्ध झाली..एक्झिबिशन सेंटर, गदिमा स्मारक, छोटे नाट्यगृह अशी ही इमारत असणार होती. पण उद्धव ठाकरे यांच्या सरकारने स्मारकाचे काम रखडवले. २०२२मध्ये सत्ताबदल झाला आणि या स्मारकाच्या पूर्ततेचा आपल्या चंद्रकांतदादा पाटील यांनी अक्षरशः ध्यास घेतला. हे काम तातडीने पूर्ण झालेच पाहिजे, अशी तंबीच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
आता या स्मारकाच्या कामाने चांगलाच वेग घेतलाय. जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. चंद्रकांतदादा स्वतः बांधकामाकडे लक्ष ठेवून आहेत. लवकरच स्मारकाचे काम पूर्ण होणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून गीतरामायणकार गदिमांच्या स्मृती जाग्या होतीलच, पण सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचाही गौरव वाढणार आहे.