पर्पल जल्लोष महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न … दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध – अजित पवार

27

पुणे : दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणून त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने  पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने 17  ते 19 जानेवारी,  2025  या कालावधीत मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर मैदानावर ‘पर्पल जल्‍लोष’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ‘दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक असून  दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल. त्यासाठी विविध घटकांच्या सहकार्याने प्रभावी उपायोजना करण्यात  येतील.’ असे प्रतिपादन  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्याच्या लोकसंख्येच्या साधारणपणे पाच टक्के लोकसंख्या दिव्यांग बांधवांची आहे. दिव्यांग बांधवांसाठीच्या योजना  राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ठराविक निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करण्याबाबतचा निर्णय शासन पातळीवर घेण्यात येईल. यासंबंधीचे आदेश देखील आदेश लवकर काढले जातील. राज्याचा अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी तरतूद केली जाईल. दिव्यांग व्यक्तींची  संख्या किती आहे, यासाठी जिल्हानुसार दिव्यांगांचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे अशी माहिती श्री. पवार यांनी दिली. महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांना मिळकत करात सवलत द्यावी आणि अतिक्रमणविरोधी कारवाई करताना दिव्यांगाना मानवतेच्या दृष्टिकोनातून सहकार्य करण्याची सूचना पवार यांनी केली.

दिव्यांग भवनच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेने दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम सुरू केले आहे. दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, रोजगार कार्यक्रम घेणे, आरोग्य उपाययोजना करणे यावर भर देण्यात येईल आणि दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांतील पदे लवकरच भरण्यात येतील. दिव्यांगांना योग्य मार्गदर्शन केले तर ते कर्तृत्वाचे शिखर गाठू शकतात, हे पर्पल जल्लोष सारख्या कार्यक्रमातून दिसून येते. दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचे, त्यांना प्रेरणा देण्याचे काम समाज म्हणून आपल्या सर्वांचे आहे असे पवार म्हणाले.

पर्पल जल्लोष कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा  मला आनंद झाला आहे असून पर्पल जल्लोष कार्यक्रम समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांनी पाहावा असा उत्सव आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन  पवार यांनी केले.

ससून रुग्णालयात दिव्यांगांचे प्रमाणपत्र मिळणार

पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दिव्यागांना प्रमाणपत्र दिले जात आहे त्याच धर्तीवर ससून रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात देखील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येतील, यासाठी आवश्यक ते निर्देश देण्यात येतील अशी घोषणा पवार यांनी यावेळी केली.

प्रदर्शनातील स्टॉलला उपमुख्यमंत्र्यांनी दिली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनातील दिव्यांगांच्या उपयोगाच्या स्वयंसेवी संस्थांच्या स्टॉलला भेट दिली. प्रदर्शनात 40 पेक्षा जास्त स्टार्टअप्स,कार्पोरेट कंपन्यानी दिव्यांगांसाठीच्या निर्मिती केलेल्या नवनवीन वस्तू पाहण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनास सर्वांनी भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला आ. उमा खापरे, आ. अण्णा बनसोडे, आ. अमित गोरखे, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त  शेखर सिंह, पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख तसेच चिंचवड महानगरपालिका सामाजिक विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे उपस्थित होते.‌

Get real time updates directly on you device, subscribe now.