खो खो विश्वचषकात भारतीय संघाने पुरुष आणि महिला दोन्ही गटात विजेतेपद पटकावून एक नवा इतिहास रचला, या देदीप्यमान कामगिरीचा संपूर्ण देशवासीयांना सार्थ अभिमान – चंद्रकांत पाटील

नवी दिल्ली : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय संघाने पुरुष आणि महिला दोन्ही गटात विजेतेपद पटकावून एक नवा इतिहास रचला आहे. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर पार पडलेल्या या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांनी त्यांच्या कौशल्याच्या जोरावर दमदार कामगिरी करत चषकावर आपले नाव कोरले. या दमदार कामगिरी बद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही संघांचे अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, महाराष्ट्राच्या मातीतील प्रियंका इंगळे हिच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला खो खो संघाने विश्वचषकाला गवसणी घातली. खो खो संघाच्या या कामागिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. संपूर्ण भारतीय महिला खो खो संघाचे हार्दिक अभिनंदन, असे म्हणत पाटील यांनी महिला संघाचे अभिनंदन केले.
महिला संघाच्या पाठोपाठ पुरुष संघाने देखील विजेते पद पटकावल्याबद्दल पाटील यांनी म्हटले, देशासाठी अभिमानाचा आणखी एक क्षण…
पहिल्या खो-खो विश्वचषकाचे विजेतेपद भारतीय पुरुष संघाने पटकावत नवा इतिहास रचला. या देदीप्यमान कामगिरीचा संपूर्ण देशवासीयांना सार्थ अभिमान वाटतो. या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण संघाचे मनःपूर्वक अभिनंदन!
भारतात पहिला खो खो विश्वचषक 13 जानेवारीपासून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाने 176 गुण मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा विजय मिळवला होता. या विजयासोबत टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेत वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली होती, आणि आता भारतात खेळवण्यात आलेल्या पहिल्याच खो-खो वर्ल्डकपवर भारतीय संघाने नाव कोरले आहे. नवी दिल्ली येथे खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळचा 38 गुणांच्या मोठ्या फरकाने एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकावले. तर पुरुष संघाने अंतिम सामन्यात नेपाळविरुद्ध 54-36 असा विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.