खानापूर येथे उपकेंद्र सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतरत्र पायपीट करावी लागणार नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे स्थापन होणार आहे. यानिमित्ताने बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची खानापूरच्या नागरिकांनी विधानभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. खानापूर येथे उपकेंद्र सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतरत्र पायपीट करावी लागणार नाही, शिवाय स्थानिक पातळीवर शैक्षणिक विकासाला चालनाही मिळेल, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र सुरू करण्यासाठी वेळोवेळी तत्कालीन राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पडळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले. या ऐतिहासिक निर्णयामुळे खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ, तासगाव, पलूस आणि कडेगाव या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या भागांतील विद्यार्थी आणि पालकांची देखील मोठी सोय होणार आहे.
या उपकेंद्रामुळे शिक्षणाचे विकेंद्रीकरण होऊन ज्ञान केंद्राचा विस्तार होणार आहे आणि शिक्षण आणखी सुलभ व सर्वसमावेशक होणार आहे. हा कल्याणकारी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार मानले.