नमाज-ए-जुम्मा अदा करायला जाल तेव्हा हातावर काळी पट्टी बांधून जा, असुदुद्दीन ओवैसी यांचे आवाहन

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व स्तरातून हल्ल्याचा निषेध होत आहे. सर्व राजकीय पक्षांनी देखील सरकार सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. धर्म विचारून निरपराध पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करत त्यांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे अशी भारतीयांची मागणी समोर येत आहे. केवळ हिंदू असल्याकारणाने केलेल्या या हत्यांमुळे देशात अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण असताना एम आय एम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असुदुद्दीन ओवैसी यांनी सर्व मुस्लिनांना एक आवाहन केलं आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांद्वारे एक पोस्ट करत ओवैसी यांनी मुस्लिम बांधवांना आवाहन केले आहे.
ओवैसी म्हणतात “पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात माझे आवाहन आहे कि उद्या जेव्हा तुम्ही नमाज-ए-जुम्मा अदा करायला जाल तेव्हा हातावर काळी पट्टी बांधून जा. याद्वारे आपण हा संदेश देऊ की आपण भारतीय, परदेशी शक्तींना भारताची शांतता आणि एकता कमकुवत करू देणार नाही.या हल्ल्यामुळे दुष्टांना आपल्या काश्मिरी बांधवांना लक्ष्य करण्याची संधी मिळाली आहे. मी सर्व भारतीयांना शत्रूच्या जाळ्यात अडकू नका असे आवाहन करतो.
एम.आय. एम. च्या या आवाहनाला मुस्लिम नागरिकांनी हातावर काल्यापट्ट्या बांधून प्रतिसाद दिला तर निश्चितच समाजाला शांतता आणि एकतेचा संदेश मिळू शकेल. त्यामुळे अनेक स्तरातून ओवैसी यांच्या या सकारात्मक आवाहनाचा कौतुक होत आहे.