राज्यातील १२,००० डिजिटल पत्रकारांना मिळणार २ लाख रुपयांचे विमा संरक्षण; मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची घोषणा

पुणे : प्रतिबिंब प्रतिष्ठान आणि डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण समारंभात एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यातील १२,००० डिजिटल पत्रकारांसाठी २ लाख रुपयांच्या अपघाती विमा संरक्षण योजनेची घोषणा केली.
पत्रकारांच्या अनिश्चित आणि अल्प उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर ही विमा योजना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, डिजिटल पत्रकारांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून संवेदनशील पावले उचलली जातील. मध्य प्रदेशने ज्या सवलती दिल्या आहेत त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन महाराष्ट्रात योजना राबवली जाईल.
ही विमा योजना प्रत्येक पत्रकाराच्या १०,००० रुपयांच्या एफडीच्या माध्यमातून कार्यान्वित होणार आहे. त्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी ४० रुपये अपघाती विमा आणि ५२० रुपये आरोग्य विमा प्रीमियम भरण्यात येणार आहे. अपघाती मृत्यू अथवा अंगविकृती झाल्यास संबंधित पत्रकाराच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.
मंत्री चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले, “पत्रकारांचे उत्पन्न मर्यादित आहे. त्यांचे पाल्य शिक्षण कसे घेतील, आई-वडिलांचा औषध खर्च कसा भागवतील, यासाठी सरकारने त्यांच्या पैशांची बचत करणे म्हणजेच कमाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा योजनांची अंमलबजावणी अत्यावश्यक आहे.
ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी ट्रस्ट व देणगीदारांची मदत घेण्यात येणार असून, ही योजना केवळ घोषणा राहणार नाही तर प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे,असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले.
या घोषणेसह पत्रकारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चा लोकार्पण सोहळा आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार समारंभ पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, संपादक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.