घरगुती गणपती सजावट स्पर्धा हि केवळ सांस्कृतिक उत्सव नव्हे, तर सामाजिक जाणिवा आणि स्थानिक प्रश्नांवर जनजागृती करण्याचा उत्कृष्ट उपक्रम – मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : गणेशोत्सव 2025 चे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर शहरातील नागरिकांसाठी घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी भाजपा जिल्हा कार्यालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
शहरातील नागरिकांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून जवळपास १५०० लोकांनी ऑनलाइन नोंदणीद्वारे सहभाग नोंदवला. ही स्पर्धा केवळ सांस्कृतिक उत्सव नव्हे, तर सामाजिक जाणिवा आणि स्थानिक प्रश्नांवर जनजागृती करण्याचा उत्कृष्ट उपक्रम ठरला, असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
स्पर्धेमध्ये कोल्हापुरातील ज्वलंत प्रश्नांवर आधारित अनेक सर्जनशील देखावे सादर करण्यात आले. खंडपीठ, ऑपरेशन सिंदूर, माधुरी हत्तीण, ग्रामीण जीवनपद्धती यांसारखे विषय केंद्रस्थानी राहिले आणि नागरिकांनी त्यांचे कौशल्य व समाजाशी असलेली बांधिलकी सुंदररीत्या व्यक्त केली.
यावेळी भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, भाजप कोल्हापूर महानगर अध्यक्ष विजय जाधव यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.