देश आणि स्वतःच्या प्रगतीसाठी नोकरीपेक्षा उद्योजकतेला प्राधान्य दिले पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

7

सांगली : विश्वकर्मा दिनानिमित्त स्वावलंबी भारत अभियान, सांगली यांच्या वतीने ‘कौशल्य विकासातून उद्योजकता भारत२०४७’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. उदय निरगुडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्ष म्हणून सहभागी होताना स्वावलंबी भारत निर्माण करण्याबाबत विचार मांडले. तसेच नवउद्योजकांचे अभिनंदन करुन त्यांचा सत्कार केला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाचे पंतप्रधान स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देत असल्याने प्रत्येक गावात यशस्वी उद्योजक निर्माण होत आहेत. २०१४ पासून देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांसाठी बिनव्याजी कर्ज योजना सुरू केली असून, एक लाखाहून अधिक तरुणांनी याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे देश आणि स्वतःच्या प्रगतीसाठी नोकरीपेक्षा उद्योजकतेला प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका मांडली.

सांगली जिल्ह्याचा जीडीपी विकास दर २०२१-२२ मध्ये ७% होता, तो आता १७.४७% पर्यंत वाढविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच ‘कमवा आणि शिका’ योजनेतून आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींना मोठा फायदा होत असून, त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी महाविद्यालयांनी प्रोडक्शन युनिट सुरू केल्यास सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील पाटील यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमास जिल्हा संघचालक सुधीर चापोरकर, प्रांत समन्वयक आनंद गोडसे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मिलिंद देशपांडे, जिल्हा समन्वयक भूपाल सूल्ह्यान, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विश्राम लोमटे, जिल्हा कार्यवाह नितीन देशमाने, विभाग समन्वयक माधवजी कुलकर्णी, भाजप नेते दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्यासह इतर मान्यवर आणि प्रबुद्ध नागरिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.