सोनामाता आदर्श कन्या विद्यालयात ‘आई प्रतिष्ठान’ च्या वतीने मोफत दंत व मौखिक तपासणी शिबिराचे आयोजन.. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिबिरास भेट देऊन उपक्रमाला दिल्या शुभेच्छा

सोलापूर : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या ‘सेवा पंधरवड्या’ च्या निमित्ताने सोलापूर येथे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोनामाता आदर्श कन्या विद्यालयात ‘आई प्रतिष्ठान’ च्या वतीने मोफत दंत व मौखिक तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे या महिन्याच्या 17 तारखेपासून देशभरात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात येणार आहे. बुधवारी याचा शुभारंभ सर्वत्र करण्यात आला. आज सोनामाता आदर्श कन्या विद्यालयात ‘आई प्रतिष्ठान’ च्या वतीने आयोजित या शिबिरात शाळेतील प्रत्येक विद्यार्थिनीची तपासणी करण्यात आली तसेच विद्यार्थिनींना दातांची योग्य काळजी घेण्यासाठी आरोग्य किट वाटप करण्यात आले.
यावेळी भाजप सोलापूर शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, मोहन डांगरे, ‘आई प्रतिष्ठान’च्या संचालिका सृष्टी डांगरे, संस्थेच्या सचिव कीर्तीलक्ष्मी अत्रे, शाळेचे मुख्याध्यापक जिलानी पटेल यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.