शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या नूतन इमारतीचे उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या (वाय.सी.एस.आर.डी.) नूतन इमारतीचे उदघाटन रविवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठांनी आता संशोधनाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे आवश्यक असून त्यासाठी त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
पाटील म्हणाले, विद्यापीठ स्तरावर अध्यापनाबरोबरच प्राध्यापकांनी संशोधनाकडे लक्ष पुरविणे ही काळाची गरज आहे. शिवाजी विद्यापीठाचे वीस संशोधक जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांमध्ये स्थान मिळवून आहेत, ही अभिमानाची बाब आहे. ही संख्या अधिक वाढविण्यासाठी नव्या पिढीमध्ये संशोधनाची आस वाढविणे आवश्यक आहे. प्राध्यापकांना त्यासाठी प्रेरित करणेही गरजेचे असते, याचे भान शासनाला आहे. त्यामुळे संशोधनासाठी लागेल तितका निधी देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकासासाठीही मदत करण्यात येईल. पॉलिटेक्निक शैक्षणिक संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यामागे शासनाची हीच भूमिका आहे. आपल्याला व्यक्ती आणि समाज यांना आवश्यक भौतिक सुविधांच्या उपलब्धतेबरोबरच जीवन जगण्याची उत्तम पद्धती प्रदान कराव्या लागणार आहेत, जेणे करून चांगला माणूस घडेल. भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमाकडून आमची हीच अपेक्षा आहे. परकीय आक्रमकांनी इथली संस्कृती, कला आणि परंपरा पुसून टाकण्याचे काम केले. युरोपातील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या परंपरेविषयी आपल्याला सांगितले जाते. तथापि, ऑक्सफर्डपूर्वी आपल्याकडे नालंदा विद्यापीठ होते. ऑक्सफर्डच्या काळातच तक्षशीला विद्यापीठ होते. या समृद्ध वारशाप्रती आपण सजग झाले पाहिजे. त्यासाठी आज इनोव्हेशन, पेटंट आणि रॉयल्टी या तिन्ही अंगांनी संशोधनाची कास पकडली पाहिजे. त्या माध्यमातून व्यक्ती आणि राज्य यांची चौफेर प्रगती होण्यासाठी कटिबद्ध व्हायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या विस्तारवृद्धीसाठी विद्यापीठाकडून वाढीव मजल्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून तो मंजूर करण्याच्या बाबतीत आपण सकारात्मक असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या सकारात्मकतेमुळे आणि मंत्री पाटील यांच्या प्रयत्नांमुळे यशवंतराव चव्हाण स्कूलच्या इमारतीस मूर्त स्वरुप प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या सहकार्यामुळेच विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक आणि अभ्यागतांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पूर्व-पश्चिम भागास जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे कामही मार्गी लागू शकले. या दोन्ही बाबींसाठी विद्यापीठ परिवार त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सुरवातीला पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून आणि फीत कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी फिरून इमारतीची पाहणी केली आणि झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वास्तुविशारद, कंत्राटदार यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर, माजी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. रघुनाथ ढमकले, स्वागत परुळेकर, डॉ. गिरीष कुलकर्णी, रमेश पवार, उपकुलसचिव रणजीत यादव, अमित कांबळे, विजय पोवार, वैभव आर्डेकर, शिवकुमार ध्याडे यांच्यासह स्कूलचे शिक्षक, अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुलगुरूंच्या कारकीर्दीचा मंत्र्यांकडून गौरव
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या कारकीर्दीचा गौरव केला. ते म्हणाले, डॉ. शिर्के यांच्या रुपाने एक अतिशय चांगले कुलगुरू येत्या ६ ऑक्टोबरला पदउतार होत आहेत. त्यामुळे मंत्री म्हणून माझ्यासमोर ‘व्हॉट नेक्स्ट?’ असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत विद्यापीठाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यासाठी शासनाकडे अथक पाठपुरावा केला. त्यामुळे विद्यापीठासाठी शासनाकडून निधीसह आवश्यक ते सर्व सहकार्य प्राप्त करवून घेण्यात त्यांना यश आले, असेही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
नूतन इमारतीविषयी…
यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटची नूतन इमारत तळमजला अधिक दोन मजले अशी नियोजित असून प्रथम टप्प्यात तळमजला प्रस्तावित होता. ते काम पूर्ण झाले असून त्यामध्ये २८६१.३० चौरस मीटरचे बांधकाम करण्यात आले आहे. यामध्ये संचालक व शिक्षकांसाठी कक्ष, वर्गखोल्या, ग्रंथालय आदी कक्षांचा समावेश आहे.