ज्येष्ठ नेते शिवाजीराव खोराटे यांचा ४८वा स्मृतिदिन व श्री दत्त विविध कार्यकारी सेवा संस्थेचा शताब्दी महोत्सव कार्यक्रम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

कोल्हापूर : सरवडे (ता.राधानगरी) येथील ज्येष्ठ नेते शिवाजीराव खोराटे यांचा ४८वा स्मृतिदिन व श्री दत्त विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रम उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर देखील कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, कृतीशील विचारातून समाजवादी विचारसरणी जोपासण्याचे कार्य कै.शिवाजीराव खोराटे यांनी केले. त्यांनी स्थापलेली शिक्षण संस्था आणि राधानगरी तालुका संघ जिल्ह्यामध्ये एक मानबिंदू ठरला आहे. दुर्गम भागात अनेक वाड्यावर संघाच्या अनेक शाखा स्थापन करून सहकाराला प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या आदर्शवत कार्याचा वारसा विठ्ठलराव खोराटे चालवत आहेत, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी संस्थेच्या ज्येष्ठ पंच्याहत्तर सभासदांचा, स्पर्धा परीक्षेतील गुणवंताचा सत्कार आणि शेतीनिष्ठ व सहकारनिष्ठ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शताब्दी वर्षानिमित्त सर्व सभासदांना भेटवस्तुचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, ॲड. शिवराज खोराटे, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, युसुफ शेख, संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णात व्हरकट, अरूणराव जाधव, कपिल खोराटे, विजय बलुगडे, दत्त सेवा संस्थेचे व संघाचे सर्व पदाधिकारी, सभासद सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.