कोल्हापूर येथे दैनिक ‘पुढारी’ चे मुख्य संपादक, पत्रमहर्षी पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा दिमाखात संपन्न
कोल्हापूर : कोल्हापूर येथे दैनिक ‘पुढारी’ चे मुख्य संपादक, पत्रमहर्षी पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त भव्य नागरी सत्कार तसेच पद्मश्रींच्या आत्मचरित्र ‘सिंहायन’ या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील सहभागी होऊन डॉ. जाधव यांचे अभिष्टचिंतन करत मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्रिमंडळातील मान्यवर सहकारी, पुढारी समूहाचे समूह कार्यकारी संपादक डॉ. योगेश जाधव, सौ. गिता जाधव, खासदार, आमदार आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव नागरी गौरव समितीच्या वतीने डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा शरद पवार आणि फडणवीस यांच्या हस्ते तलवार आणि सन्मानचिन्ह तसेच शाल देऊन सत्कार करण्यात आला, तर सौ. गीतादेवी जाधव यांचा पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलिस परेड मैदानावर बुधवारी अलोट जनसागराच्या साक्षीने हा दिमाखदार सोहळा झाला.
आपल्या विचारांशी कोणतीही तडजोड न करता संघर्षातून उभे राहत, पत्रकारितेचा व्रतस्थ वारसा जपणाऱ्या दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब जाधव यांनी आपल्या लेखणीतून अनेकांना जीवनाचा मार्ग दाखवला. जनतेनेच त्यांना पुढारीपण बहाल केले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. डॉ. जाधव यांचे ‘सिंहायन’ पुस्तक म्हणजे राज्याच्या राजकीय, सांस्कृतिक, औद्योगिक अशा सर्वप्रकारच्या जडणघडणीचा इतिहास, मागोवा बाळासाहेबांच्या नजरेतून वाहत आहे, असे ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले, बाळासाहेब जाधव यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आहे आणि त्याला आपल्याला गेले पाहिजे ही प्रत्येकाची भावना होती. हेच समाजाचे प्रेम बाळासाहेबांनी कमावले आहे. सहस्रचंद्रदर्शन सोहळा म्हणजे ज्यांनी एक हजार पौर्णिमेचे चंद्र पाहिले आहेत, तेवढा त्यांचा अनुभवही आहे, असे मानले जाते; पण एक हजार पौर्णिमांबरोबर त्यांनी एक हजार अमावस्याही पाहिलेल्या आहेत. त्यांचा सामना केलेला आहे. या सर्वाचे मूल्यमापन केले जाते, त्यावेळी त्यांनी जीवनात कमावलेला परिपाक म्हणजे हा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आहे आणि विशेष म्हणजे तो सर्व समाज मिळून करत आहे, याचा आनंद आहे.
‘पुढारी’ हे केवळ वृत्तपत्र नाही, तर महाराष्ट्राच्या मनामनात प्रकाश देणारा दीपस्तंभ आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा गौरव केला. सत्तेला आरसा दाखवण्याबरोबर अन्यायाविरुद्ध लढणारे डॉ. जाधव यांनी कोल्हापूर आणि सामान्य जनतेसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. टोल नाके हटविण्यापासून सीमावादाच्या लढ्यापर्यंत, जनतेच्या विविध प्रश्नांवर त्यांनी कायम आवाज उठवला, असेही शिंदे म्हणाले.