प्राध्यापक पदोन्नतीसह कॅश-बेनिफिट प्रक्रियेला गती – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
नागपूर : राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातील प्राध्यापक पदोन्नती आणि कॅश-बेनिफिट प्रक्रियेबाबत युजीसीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार गती देण्यात आली असून याचा पात्र प्राध्यापकांना लाभ मिळेल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य जयंत आसगावकर यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात मंत्री पाटील यांनी ही माहिती दिली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सतेज पाटील, अभिजित वंजारी, अरुण लाड आणि निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.
पाटील यांनी सांगितले, युजीसीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार पदोन्नती आणि कॅश-बेनिफिट संदर्भातील कार्यवाही केली जात आहे. या संदर्भातील माहिती विद्यापीठे आणि महाविद्यालयांकडून मागविण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी शासनाकडून उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी प्राध्यापक भरती प्रक्रिया गतीने राबविण्यात येणार आहे. युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये ७५० प्राध्यापक आणि सिनिअर महाविद्यालयांमध्ये ५५०० प्राध्यापक पदांची भरती केली जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली असल्याचे सांगून पाटील म्हणाले, विद्यापीठांना स्वनिधीतून ठोक ५० हजार वेतनावर प्राध्यापक घेण्यास अनुमती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे स्कॉलरशिपचे अनुदान वेतन या बाबीमध्ये देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती वेळेत मिळेल. तसेच भविष्यात शिक्षकेतर पदे भरण्यात येतील असेही त्यांनी या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.