कोल्हापुरी चप्पलसाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात मुंबईत सामंजस्य करार… ही भागीदारी म्हणजे स्थानिक परंपरेचा जागतिक सन्मान – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापुरी चप्पल ही केवळ पादत्राणे नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक राहिली आहे. नैसर्गिक कातडं, हाताने केलेली शिवण, टिकाऊपणा आणि सौंदर्य यांचा अद्वितीय संगम म्हणजे कोल्हापुरी चप्पल. कोल्हापुरी चप्पलच्या माध्यमातून महाराष्ट्राची ओळख, आपल्या कारागिरांचे कौशल्य आणि ‘मेक इन इंडिया’ चा अभिमान जगभर पोहोचत आहे. कोल्हापुरी चप्पलसाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि,पिढ्यान्पिढ्या कारागिरांनी जपलेली ही कला आजही तितकीच जिवंत आहे. आज हाच पारंपारिक वारसा जागतिक लक्झरी ब्रँड प्राडाने ओळखला आहे. कोल्हापुरी चप्पलसाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात मुंबईत सामंजस्य करार झाला असून, महाराष्ट्रातील कुशल कारागिरांच्या हातून साकारलेल्या चपला फेब्रुवारी २०२६ पासून जगभरातील ४० प्राडा स्टोअर्स आणि प्राडाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत.
ही भागीदारी म्हणजे स्थानिक परंपरेचा जागतिक सन्मान असल्याचे पाटील यांनी म्हटले. कोल्हापुरी चप्पलच्या माध्यमातून महाराष्ट्राची ओळख, आपल्या कारागिरांचे कौशल्य आणि ‘मेक इन इंडिया’ चा अभिमान जगभर पोहोचत आहे. या ऐतिहासिक प्रवासात सहभागी असलेल्या सर्व कारागिरांचे पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली-भारत व्यापारी परिषदेत कोल्हापुरी चप्पलसाठी सामंजस्य करार झाला आहे. या उपक्रमाद्वारे पारंपारिक कोल्हापुरी चप्पलनिर्मिती आणि प्राडाचे आधुनिक, समकालीन डिझाइन्स यांचा संगम घडवून आणला जाणार आहे. लिडकॉमच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला या उपक्रमाला पाठिंबा देण्यास आनंद होत आहे, जो कोल्हापुरी चप्पलची प्रामाणिकता आणि वारसा साजरा करताना भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जागतिक व्यासपीठांवर नेण्याच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकतो.