उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘विकसित भारत – पेंटिंग प्रदर्शन’चे उद्घाटन
नागपूर : भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या “सेवा पर्व–२०२५” उपक्रमांतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “विकसित भारताचा दृष्टिकोन” या संकल्पनेवर आधारित पेंटिंग कार्यशाळेत साकारलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यशाळेत नागपूरसह महाराष्ट्रातील विविध शहरांमधील १०० हून अधिक व्यावसायिक कलाकारांनी सहभाग घेतला. “विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक विचार कलाकारांनी आपल्या कलाकृतींतून प्रभावीपणे मांडले. कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या निवडक ५० उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाच्या कलादालनात आयोजित करण्यात आले असून, मंत्री पाटील यांनी या कलाकृतींची सखोल पाहणी केली.

प्रदर्शनातील निवडक पेंटिंग्जचा आस्वाद घेत मंत्री पाटील यांनी कलाकारांशी व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. ‘विकसित भारत’ ही संकल्पना विविध माध्यमांतून कशी अभिव्यक्त केली आहे, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेत कलाकारांच्या सर्जनशीलतेचे मनापासून कौतुक केले.
यावेळी त्यांनी महाविद्यालयातील फोटोग्राफी विभागास भेट देऊन विद्यार्थ्यांकडून फोटो शूट करून घेतले. तसेच प्रिंटमेकिंग विभागास भेट देत लिथोग्राफी प्रक्रियेतील तांत्रिक बाबी विद्यार्थ्यांकडून जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक कौशल्यांचे विशेष कौतुक करत त्यांनी चॉकलेट देऊन प्रोत्साहन दिले.

या प्रसंगी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते “कलाकार कट्टा” या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या बाहेर नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या ‘कलाकट्टा’ या आउटडोअर गॅलरीमध्ये बी.एफ.ए. (अप्लाइड आर्ट) विभागाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव या विषयावर आधारित पोस्टर्स प्रदर्शित केल्या आहेत.
भारताच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासात कला शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन करत मंत्री पाटील म्हणाले की, कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, व्यावसायिक संधी आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न केले जातील.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ साबळे, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळा व कला प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे मंत्री श्री पाटील यांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.