शिरोळमध्ये भाजप महायुतीचे रणशिंग; उदगांवमध्ये चंद्रकांत पाटील यांची तोफ धडाडली

11

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि शिरोळ पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उदगांव येथे भव्य चौक सभेद्वारे झाला. सभेच्या प्रारंभी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल सुरू ठेवत अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. त्यामुळे २५ कोटी कुटुंबे दारिद्र्यरेषेबाहेर आली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील ४,६५,५४० शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. लाडकी बहिण योजनेचे जिल्ह्यात १०,१३,६३० तर शिरोळमध्ये १,०४,००० लाभार्थी आहेत. सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला असून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी अर्थसंकल्पात SHE-Mart ची तरतूद करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदीजी आणि देवेंद्रजी झपाटून काम करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपा महायुतीलाच विजयी करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.

यावेळी गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, रजनीताई मगदूम, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, वर्षाताई पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनिल मादनाईक, विजय भोजे, महेश देवताळे, शिवाजी खोद्रे यांच्यासह भाजपा महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.