३५ वा ‘डिपेक्स २०२६’ – भव्य तंत्रज्ञान प्रदर्शनाचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीगणेशा!
छत्रपती संभाजीनगर : तंत्रज्ञान आणि संशोधनाचे क्षितीज विस्तारणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि सृजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३५ व्या ‘डिपेक्स २०२६’ (DIPEX-2026) राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आज विधीवत भूमीपूजन संपन्न झाले. शहरातील एमआयटी (MIT) च्या भव्य मैदानावर होणाऱ्या या प्रदर्शनाच्या तयारीचा श्रीगणेशा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
येत्या ५ ते ८ मार्च २०२६ दरम्यान हे प्रदर्शन भरवले जाणार असून, यात राज्यातील हजारो तरुण संशोधक आपले कल्पक प्रकल्प सादर करणार आहेत. याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, डिपेक्स हे केवळ प्रदर्शन नसून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि तांत्रिक कौशल्याला जागतिक स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. ३५ वर्षांची ही गौरवशाली परंपरा नव्या पिढीला उद्योजकतेकडे नेण्यासाठी निश्चितच प्रेरक ठरेल. त्यांनी या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या सर्व तरुण संशोधकांना आणि आयोजकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
डिपेक्समध्ये अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन आणि कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शित केले जातात. या प्रदर्शनामुळे उद्योग जगत आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होते.
यावेळी मंत्रिमंडळातील मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण, एमएसबीटीचे संचालक भरत अमळकर, तंत्रशिक्षण संचालक विनोद मोहितकर, डिपेक्स २०२६ समितीचे सदस्य राजेंद्रसिंह जबिंदा, माजी महापौर समीर राजूरकर, देवगिरी प्रदेशाध्यक्ष सुरेश मुंडे, प्रदेश मंत्री वरुण नन्नवरे, प्रवीण घुगे, किशोर शितोळे, रामभाऊ भोगले, प्रा. रमेश जायभाय, सिद्धेश्वर लटपटे, ॲड. अरविंद केंद्रे, शिवा देखणे यांच्यासह विद्यार्थी परिषदेचे अनेक जुने आणि नवीन कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.