मंत्री चंद्रकांत पाटील यांचा काशी दौरा संपन्न; सपत्नीक विश्वनाथ दर्शन, गंगा आरती आणि ‘नमो घाटा’च्या सौंदर्याने भारावले मन
वाराणसी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकताच उत्तर प्रदेशातील पवित्र अशा वाराणसी (काशी) नगरीचा आध्यात्मिक दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी सपत्नीक श्री काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले, गंगेच्या काठावरील दिव्य आरतीचा अनुभव घेतला आणि बदलत्या काशीचे नवे रूप असणाऱ्या ‘नमो घाटा’ला देखील भेट दिली.
पवित्र गंगेच्या साक्षीने साकारलेल्या ‘श्री काशी विश्वनाथ’ धाममध्ये मंत्री पाटील यांना सपत्नीक दर्शनाचा योग लाभला. मंदिरात प्रवेश करताच मंत्रोच्चार आणि घंटानादाने निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणाने त्यांचे मन भारावून गेले. महादेवांच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेताना, “मनातील सर्व चिंता आणि ताण विरून गेले असून एक विलक्षण शांती आणि नवचैतन्य लाभले आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
बाबा विश्वनाथाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मंत्री महोदयांनी गंगा नदीच्या तटावर होणाऱ्या मनमोहक ‘गंगा आरती’चा लाभ घेतला. हातातील दिव्यांचा लख्ख प्रकाश, शंखनाद आणि “हर हर गंगे”च्या जयघोषाने भारावलेल्या वातावरणात ते तल्लीन झाले. गंगेच्या या पावन प्रवाहाने मनाला एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा दिल्याचे त्यांनी नमूद केले.
या दौऱ्यात त्यांनी विशेषत्वाने ‘नमो घाट’ या विहंगम स्थळाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा घाट म्हणजे काशीच्या प्राचीन वारशाचा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम असल्याचे त्यांनी सांगितले. घाटावरील ‘नमस्ते’च्या आकारातील भव्य मूर्ती आणि गंगा मातेचे विस्तीर्ण रूप पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. “काशीचा हा कायापालट श्रद्धेसोबतच पर्यटनालाही नवी दिशा देणारा ठरत आहे,” असे गौरवद्गार त्यांनी काढले.