५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी: सुवर्णपदक विजेत्यांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

8

कोलंबिया : कोलंबिया येथे संपन्न झालेल्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने मिळवलेल्या यशाची व्याप्ती आता जागतिक पातळीवर सर्वोच्च ठरली आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या जगातील तब्बल ८७ देशांतील ३८१ विद्यार्थ्यांमधून भारताने रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान या दिग्गज देशांच्या बरोबरीने संयुक्तपणे पहिले स्थान पटकावून जागतिक पटलावर भारताचा दबदबा निर्माण केला आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक आणि सुवर्ण कामगिरीचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष कौतुक केले आहे.

आपल्या अभिनंदन संदेशात मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय संघाचे हे अभूतपूर्व यश म्हणजे आपल्या युवा शक्तीच्या अफाट क्षमतेचे आणि विज्ञान व संशोधनाप्रती असलेल्या त्यांच्या अढळ आवडीचे आणखी एक उत्तम उदाहरण आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. त्यांनी जागतिक पातळीवर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

मंत्री पाटील यांनी पुढे नमूद केले की, गेल्या दशकात भारतीय विद्यार्थ्यांनी या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाच्या विविध आवृत्त्यांमध्ये अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांची विज्ञानातील ही प्रगती देशाच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. या यशाबद्दल त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचेही कौतुक केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.