काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि समाजपादी पार्टीनं त्यांची महिलांविरोधी मानसिकता लोकशाहीच्या पवित्र मंदिरात, संसतेदच दाखवली – मंत्री चंद्रकांत पाटील
नवी दिल्ली : महिला आरक्षण म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक विरोधकांनी बहुमताने फेटाळले. या विधेयकाबद्दल बरीच चर्चा झाली. पण लोकसभेच्या पटलावर त्यावर मंजुरीची मोहोर उमटू शकली नाही. घटना दुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी एकूण उपस्थित सदस्यांपैकी 2/3 बहुमत मिळणे आवश्यक असते. आज 528 सदस्यांनी मतदान केले. हे विधेयक मंजूर होण्यासाठी 352 हा बहुमताचा आकडा होता, मात्र विधेयकाच्या बाजूने 298 मते मिळाली. तर विधेयकाच्या विरोधात 230 मते मिळाली, त्यामुळे हे विधेयक लोकसभेत पास होऊ शकले नाही. यावरून चांगलेच वातावरण तापले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावरून विरोधकांना चांगलेच धारेवर धरले आहे.
पाटील यांनी म्हटले, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि समाजपादी पार्टीनं त्यांची महिलांविरोधी मानसिकता लोकशाहीच्या पवित्र मंदिरात, संसतेदच दाखवली. नारी शक्ती वंदन अधिनियम (१३१वी घटनादुरुस्ती) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर संसदेत मतदान झालं. त्यात या राजकीय पक्षांचे महिलाविरोधी चेहरे, त्यांची महिलांचा सन्मान न करण्याची वृत्ती उघडकीस आली. त्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. त्यामुळे देशातल्या माता-भगिनींना लोकसभा-विधानसभेतही ३३ टक्के आरक्षण, जो त्यांचा अधिकारच आहे, तो आता मिळू शकणार नाहीये.
विरोधात मतदान करणं यांच्यासाठी पुरेसं नव्हतं. मतदानाची आकडेवारी जाहीर होताच या अभद्र यूपीएच्या सदस्यांनी केलेला विजयोन्माद तर निव्वळ ओंगळवाणा. किळसवाणा असल्याचे पाटील यांनी म्हटले. पण, एक गोष्ट निश्चित की, भाजपा आणि एनडीए महिलांच्या सन्मानासाठी आणि विरोधक महिलांच्या अपमानासाठी… हे चित्र माता-भगिनींसाठी आता स्पष्ट झालंय. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे, यापुढील प्रत्येक निवडणुकीत महिलांविरोधी भूमिका घेणाऱ्यांना नारीशक्ती चांगलीच अद्दल घडवेल, हे मात्र नक्की, असे पाटील यांनी म्हटले.