बांबू कौशल्यविकासातून रोजगार आणि उद्योजकतेला नवी दिशा! – मंत्री चंद्रकांत पाटील
लोणेरे : रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे आज बांबू कौशल्य विकास आणि संशोधन केंद्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
उद्घाटनानंतर मंत्री पाटील यांनी केंद्राची पाहणी करून विविध कौशल्य प्रशिक्षण उपक्रम, संशोधन सुविधा आणि बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी व कारागिरांनी स्थानिक संसाधनांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तू पाहताना त्यातील काही वस्तू स्वतः खरेदी करून त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्याचा छोटासा प्रयत्न केला.
या केंद्राच्या माध्यमातून कौशल्य, संशोधन आणि उद्योग यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेची नवी वाट मिळेल, असा विश्वास आहे. DBATUमधील हा उपक्रम बांबू आधारित उद्योगांना आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला निश्चितच बळकटी देणारा ठरेल, असे पाटील यांनी यावेळी म्हटले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, DBATUचे कुलगुरू रजनीश कामत, कुलसचिव प्रा. अमित शेष तसेच विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते.