कंगना रनौत यांच्यावर अटकेची टांगती तलवार, आता तरी सुनावणीला हजर होणार का?

मुंबई: गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या फौजदारी तक्रारीशी संबंधित प्रकरणात आज (20 सप्टेंबर) अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीला अभिनेत्री कंगना रनौत हजर राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मागील सुनावणीत अंधेरी न्यायालयाने  कंगनाला इशारा दिला आहे की, या सुनावणीला जर ती उपस्थित राहिली नाही, तर तिच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला जाणार आहे.

मागील सुनावणीत कंगनाच्या वकिलांनी कोर्टात सांगितले होते की, कंगनाची तब्येत ठीक नाही, तिला कोरोनाची लक्षणे असल्याने तिला टेस्ट देखील करून घ्यायची होती. मात्र, आज कंगनाला कोर्टात हजर रहावेच लागणार आहे.

अटकेची टांगती तलवार

लेखक-दिग्दर्शक जावेद अख्तर यांनी कंगना रनौतविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता, ज्यावर 14 सप्टेंबर अंधेरी न्यायालयात सुनावणी होणार होती. जावेद अख्तर पत्नी शबाना आजमीसह कोर्टात पोहोचले होते. पण, कंगना रनौत कोर्टात पोहोचली नाही. कंगनाच्या वकिलाचे म्हणणे होते की, अभिनेत्रीची तब्येत खराब आहे, म्हणूनच ती न्यायालयात हजर राहू शकली नाही. आता या प्रकरणी सुनावणी आज होणार आहे. पण, न्यायाधीशांनी म्हटले आहे की, जर कंगना या सुनावणीत न्यायालयात हजर झाली नाही, तर तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल.

न्यायालयात  नेमके काय घडले

कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयात सांगितले की, कंगना आजारी आहे. त्यामुळे ती न्यायालयात येऊ शकत नाही. तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, म्हणून त्यांना आजच्या सुनावणीपासून सूट दिली पाहिजे. त्यांनी असेही सांगितले की, कंगनाला कोरोना चाचणी करावी लागेल, कारण गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अनेक लोकांना भेटली आहे. कंगनाच्या वकिलाने कोर्टात वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर केले आहे आणि एक आठवड्याचा वेळही मागितला आहे.