करुणा शर्मा यांना दिलासा, तब्बल 16 दिवसांनी तुरुंगाबाहेर, न्यायालयाने मंजूर केला जामीन

बीड: न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांना अंबाजोगाई सत्र न्यायालयाने आज मंगळवारी (ता.२१) २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ व हल्ला केल्याच्या आरोपावरुन शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना ६ सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

यापूर्वी फिर्यादी व तपास अधिकारी उपस्थित न राहिल्याने १८ सप्टेंबर रोजी जामीनावर सुनावणी होऊ शकली नव्हती. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज मंगळवारी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

करुणा शर्मा यांना पाच सप्टेंबरला अटक झाली होती. करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली करुणा शर्मा आणि त्यांचा सहकारी अरुण मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांचे चालक अजय मोरेंवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत होतं. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडा वेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत होती. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत होतं.