किरीट सोमय्यांना कोल्हापूरात ‘नो एण्ट्री’; मुरगूड नगरपालिकेच्या सभेत ठराव मंजूर

कोल्हापूर: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांच्या हा दौरा गाजण्याची शक्यता आहे. कारण मुरगूड नगरपालिकेने मुरगूड शहरात सोमय्या यांना कायमच्या प्रवेश बंदीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर केला आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुरगूड नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी झालेल्या ठरावात किरीट सोमय्यांना एन्ट्री द्यायची नाही, असा ठराव एकमताने पारित करण्यात आला. मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर असलेले किरीट सोमय्या मुश्रीफांविरोधात तक्रार देण्यासाठी मुरगुड पोलीस ठाण्यात जाण्याच्या तयारीत आहेत. सोमय्यांचा नियोजित दौर्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने ठराव मंजूर केला आहे.
किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. कोल्हापुरात जाऊन पाहणी करण्याचा सोमय्यांनी चंगच बांधला. पण पुढे महाविकास आघाडीने देखील आक्रमक पवित्रा घेतला आणि सोमय्यांना कोल्हापुरात न जाता कराडमध्येच थांबावं लागलं. पण यादरम्यान कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे समर्थक आणि मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता याच्याही पुढे जाऊन मुरगूड शहरात सोमय्या यांना कायमच्या प्रवेश बंदीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.
किरीट सोमय्यांचा दौरा काय?
येत्या गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार असून 27 तारखेला उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा घोटाळ्यांची पाहणी करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाहणी करण्यास जाणार असून अडवून दाखवा, असं आव्हान किरीट सोमय्यांनी दिलं आहे.