उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का: मावस भावाच्या घरावर ईडीकडून छापा

11

पुणे: सध्या ईडीच्या वतीने राजकीय नेत्यांना टार्गेट केले जात आहे. या दरम्यान काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर आज पुन्हा अजित पवार यांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीने सकाळीच छापा टाकला आहे. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात ही छापेमारी करण्यात आली आहे. या छाप्यामुळे अजित पवारांना धक्का बसला आहे.

जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. ते अजित पवार यांचे मावस भाऊ आहेत. कदम हे सहकार नगरमध्ये राहतात. त्यांच्या घरी आज सकाळीच ईडीने धाड मारली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कदम हे मुंबईत आहेत. घरी ईडीने धाड मारल्याचं कळताच कदम हे मुंबईहून पुण्याकडे जायला निघाले आहेत.

दौंड सहकारी साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते. तर कारखान्यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा खुलासा कारखान्याकडून करण्यात आला होता. त्यानंतरही ईडीकडून धाड मारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.