चिंचवडगावतील मोरया गोसावी मंदिरात लहान मुले, जेष्ठ नागरिक, गरोदर महिलांना प्रवेश बंदी

चिंचवड: कुठे आरती, कुठे पूजा, तर कुठे हरहर महादेवचा जयघोष… असा भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम संपूर्ण पुणे जिल्ह्यात पाहायला मिळाला. तब्बल दीड वर्षानंतर काल घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील मंदिरे उघडण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातच नव्हे तर काल संपूर्ण राज्यात हेच चित्रं होतं.  चिंचवडगावतील प्रसिद्ध मोरया गोसावी मंदिरात लहान मुले, जेष्ठ नागरिक, गरोदर महिलांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जाहीर नियमावली नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

तब्बल दीड वर्षानंतर मंदिरे उघडणार असल्याने काल पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात हजेरी लावली होती. सकाळी सकाळीच देवाला फूल हार अर्पण करून भाविकांनी मनोभावे पूजा केली. पहाटेच्या आरतीतही अनेक भाविक सहभागी झाले होते. तब्बल दीड वर्ष बंद असलेल्या मंदिरातून काल सकाळीच टाळ मृदूंग आणि आरतीचे आवाज येत होते. त्यामुळे संपूर्ण वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली होती. यावेळी प्रत्येक मंदिरात कोरोना नियमांचे पालन करण्यात येत होतं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतानाच भाविकांनी तोंडाला मास्कही लावले होते. तसेच मंदिर व्यवस्थापनाकडून सॅनिटायझरची व्यवस्थाही केली होती.

काय आहेत नियम

हातावरती सॅनिटायझर घेऊनच मंदिरात प्रवेश दिला जाईल.

मास्क शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

राज्य शासनाच्या सुचनेनुसार ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व गरोदर महिलांना मंदिरात प्रवेश बंदी आहे.

सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) ठेवुनच श्रींचे दर्शन घ्यावे.

आजारी व्यक्तिंना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

मंदिर व मंदिर परिसरात धुम्रपान, थुंकल्यास अथवा मास्कचा वापर न केल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल.

फुले हार नारळ, पेढे इ. मंदिरात आणु नये.