खोटे बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी हाकलून लावले हे सर्वांना माहीत – उद्धव ठाकरे

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अपेक्षेप्रमाणे मानापमान नाट्य पाहायला मिळालं. तब्बल 16 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही. इतकंच नाही तर नारायण राणे यांनी व्यासपीठावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी राणे यांनी बाळासाहेबांची आठवण काढत मी बाळासाहेबांच्या विचारांवर चालत असल्याचे म्हटले होते. तसेच बाळासाहेबांना खोटे बोलणारे चालत नव्हते. ते बोलणाऱ्यांचा तिरस्कार करत असल्याची आठवण करून दिली होती. नेमका हाच धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. कुणी काय केलं आणि कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पाठांतर करून बोलणं वेगळं, आत्मसात करून बोलणं वेगळं, तळमळीनं बोलणं वेगळं आणि मळमळीनं बोलणं वेगळं असा टोला त्यांनी लगावला.
नजर लागू नये म्हणून काळा टिका लावावा लागतो, असे काही लोकही इथे हजर आहेत. पण कोकणचे लोक हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत राहात नाहीत. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिलं आणि मला त्यांचा अभिमान आहे. नारायण राणे खरे बोलले, बाळासाहेबांना खोटे बोलणाऱ्यांचा राग होता. यासाठी बाळासाहेबांनी खोटं बोलणाऱ्यांना शिवसेनेतून हाकलून लावलं हे सर्वांनाच माहीत आहे, अशा शब्दात नारायण राणेंवर टीका केली. नारायणराव, आपण लघु उद्योग खात्याचे मंत्री आहात; पण केंद्रीय मंत्री आहात. विकासकाम आपण नक्की कराल, असं ते म्हणाले. कोकणाची संपत्ती आपल्याला जगासमोर न्यायची आहे. एवढी वर्षे विमानतळाला का लागली ? आम्ही कोकणचं कॅलिफोर्निया करू, असे काही जण म्हणाले होते. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, कॅलिफोर्नियाला अभिमान वाटेल असं कोकण उभं करू.
बाकीच्या गोष्टी आदित्यने सांगितल्या आहेत. पाठांतर करून बोलणं वेगळं, आत्मसात करून तळमळीनं बोलणं वेगळं आणि मळमळीनं बोलणं आणखी वेगळं असतं. त्याबद्दल मी नंतर बोलेल, असं म्हणत त्यांनी राणेंचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. शिंदे महाराष्ट्राच्या अनेक विमानतळांबद्दल भरभरून बोलले. तुमचं अभिनंदन करतो. इतक्या लांब राहूनही मराठी मातीचा संस्कार आपण जपलात. मात्र इथल्या मातीत काही बाभळीची झाडे उगवलीत त्याला मी काय करू, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंवर निशाणा साधला. आजचा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे, आदळआपट करण्याचा नाही. आपलं कोकण महाराष्ट्राचं वैभव आहे ते आपण जगासमोर नेत आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. त्या सुविधांमध्ये सर्वांत महत्त्वाचा भाग हा विमानतळ असतो. आपण गोव्याच्या विरोधात नाही. पण आपलं वैभव कमी नाही. उलट आपण काकणभर सरस आहोत. कमी अजिबात नाहीत.