‘माझी प्रार्थना आहे की, आर्यन खानला जामीन मिळावा’ – राम कदम
मुंबई: क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. २ ऑक्टोबरला आर्यन खानला क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. जामिनावरील निर्णय आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत राखून ठेवला होता. दरम्यान आज सुनावणी होणार असल्यामुळे ट्विट करत भाजप नेते राम कदम यांनी प्रार्थना केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये राम कदम यांनी म्हटले आहे की, प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन् कायद्याप्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे. त्याचबरोबर यावेळी राम कदम यांनी ठाकरे सरकारवरही टीका केली आहे. ही लढाई कोणा एक व्यक्ती विशेषच्या विरोधातील लढाई नाही, अखंड मानवजातीची ड्रग्सविरोधी लढाई आहे. अपेक्षा होती महाराष्ट्र सरकार निदान या खतरनाक ड्रग्स प्रकरणात ड्रग्स माफियाच्या विरोधात उभे राहतील. पण वसूलीचा प्रभाव स्पष्ट दिसला, असे राम कदम म्हणाले आहेत.
प्रार्थना आहे की आज #आर्यनखान ला जामीन मिळावा. संविधान अन कायद्या प्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे ही लढाई कोणा एक व्यक्ति विशेषच्या विरोधातील लड़ाई नाहीं अखंड मानव जातीची #ड्रग्स विरोधी लढाई आहे. अपेक्षा होती #महाराष्ट्रसरकार निदान ह्या खतरनाक ड्रग्स प्रकरणात
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) October 20, 2021
आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत गरीब, नेता, अभिनेता असो…कायद्याच्या समोर सर्वे समान आहेत़. भविष्यात आर्यनने ज्या ड्रग्सचा कलंक त्याच्या बदनामीचे कारण झाले, त्या ड्रग्सविरोधात प्रखर लढाई उभी करून युवकांना ड्रग्सपासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करण्यासाठी एक देशवासी या नात्याने शुभेच्छा, असेही राम कदम म्हणाले आहेत.