नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप; ‘माझं घर आणि शाळेची रेकी सुरु’, दोघांचे फोटोही केले ट्विट

मुंबई: मुंबईतल्या कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणापासून नवाब मलिक हे नाव चर्चेत आहे. कारण 2 ऑक्टोबरला समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली आणि आर्यन खानला अटक केली. त्यानंतर 6 ऑक्टोबरला नवाब मलिक यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन एनसीबीची कारवाई म्हणजे बनाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर जवळपास रोज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी समीर वानखेडेंवर विविध आरोप केले आहेत. आता नवाब मलिक यांनी एक नवा खळबळजनक आरोप केला आहे.

तीन फोटो नवाब मलिक यांनी ट्विट केले आहेत. त्यानंतर ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणतात की हे लोक कारमध्ये बसून गेल्या दिवसांपासून माझं घर आणि शाळा यांची रेकी करत आहेत. जर यांना कुणी ओळखत असेल तर मला माहिती द्या. जे लोक या फोटोंमध्ये दिसत आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला माझी काही माहिती हवी असेल तर मला येऊन भेटा, मी तुम्हाला सगळी माहिती देईन. असं म्हणत नवाब मलिक यांनी तीन फोटो ट्विट केले आहेत.

या फोटोंपैकी दोन फोटोंमध्ये दोन माणसं दिसत आहेत ज्यांना उद्देशून नवाब मलिक यांनी हे आवाहन केलं आहे. तर तिसऱ्या फोटोत हे दोघे ज्या कारमध्ये बसले आहेत त्या कारचा नंबर दिसतो आहे. MH 47 AG 2466 असा क्रमांक असलेली ही कार आहे.