मी केलेले आरोप जर खोटे असतील तर मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे – नवाब मलिक

6

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोपाचे रान उठवले आहे. मी आज पर्यंत केलेले जर हे सगळे आरोप खोटे निघाले तर मी माझ्या मंत्री पदाचा जाजीनामा द्यायला तयार आहे, अशी रोखठोक भूमिका राज्याचे अल्पसंख्याक नवाब मलिक यांनी जाहीर केली आहे.

समीर वानखेडे यांच्या जन्माच्या दाखल्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. समीर दाऊद वानखेडे या नावाने असलेला जन्माचा दाखला शेअर करत ‘इथूनच सुरू झाली सगळी घोटाळेबाजी’ असे ट्वीट मलिक यांनी केले होते. त्यानंतर हा दाखला खोटा असल्याचे व आपण धर्म बदलला नसल्याचे वानखेडे यांनी स्पष्ट केले होते. मलिक यांचे सर्व आरोप त्यांनी फेटाळले होते.

समीर यांच्या वडिलांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले होते व मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनीही मलिक यांच्यावर पलटवार केला. ‘नवाब मलिक हे रोज उठून एक कोणतंतरी खोटं प्रमाणपत्र समोर आणतात आणि आम्ही खरं प्रमाणपत्र दाखवून त्यांचे आरोप फेटाळतो. तिथेच कोण घोटाळेबाजी करत आहे हे स्पष्ट होते. दुसरा मुद्दा राहिला खंडणीचा. याआधी समीर वानखेडे यांच्यावर असे आरोप का झाले नाहीत? आताच त्यांना का अडकवलं जात आहे? लोक बुद्धू नाहीत. लोकांना सगळं समजतं, असं सांगतानाच वानखेडे हे कोणत्याही पक्षाचे काम करत नाहीत तर ते एक स्वतंत्र अधिकारी आहेत आणि त्यांना त्यांचे काम करू दे, असे रेडकर यांनी मंगळवारी माध्यमांना सांगितलं.

मलिक यांनी या सर्वावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे व ते आपल्या दाव्यांवर ठाम आहेत. ‘वानखेडे कुटुंबीय सर्वांची प्रमाणपत्रे दाखवत आहेत पण समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला त्यांनी दाखवलेला नाही. त्यांचा शाळेचा दाखला, जात प्रमाणपत्रही ते दाखवत नाहीत. इथेच सगळी गोम आहे’, असे सांगताना ट्वीटरवर समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला जो मी पोस्ट केला आहे तो सरकारी अधिकृत दस्तावेज नसेल तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे खुले आव्हानच मलिक यांनी दिले.

माझा आरोप खरा ठरला तर वानखेडे काय करणार, कोणता त्याग करणार, हे मात्र त्यांनी सांगावे, असेही मलिक म्हणाले. मी वानखेडे कुटुंबाची मानहानी करत आहे, असे वाटत असेल तर माझ्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करा, असे आव्हानही मलिक यांनी दिले.

Read Also :

 

Get real time updates directly on you device, subscribe now.