अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा संपन्न
पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोंडिबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाइ टोणगे यांना मिळाला.
शेतकरी असलेले हे दाम्पत्य गेली तीस वर्षे सलग पंढरीच्या वारीसाठी येत आहे. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, सौ. पवार तसेच वारकरी प्रतिनिधीचा मान मिळालेल्या टोणगे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार समाधान आवताडे आदी उपस्थित होते.
कार्तिकी एकादशी पूजेच्या वेळी विठुरायाला निळ्या रंगाचा बनारसी अंगरखा, पितांबर, शेला तर श्री रुक्मिणी मातेला हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसवण्यात आली. त्यामुळे सावळ्या विठुरायाचे अर्थात राजस सुकुमाराचे आणि श्री रुक्मिणीतेचे रूप अधिकच खुलून दिसू लागले.
यावेळी अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधत म्हटले, “18-20 महिने मंदिर बंद होती. वारीत खंड पडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही मला म्हणायचे हे पुर्वरत व्हायला पाहिजे. मात्र कोरोना कमी होत नव्हता. मात्र, यंदा प्रशासनाला चांगली साथ दिली. सगळ्यांनी एकत्रित ठरवून यात्रा केली. आता मंदिरंही सुरु झाली आहेत. महापूजेमध्येही मी सहभागी झालो. पण, महाराष्ट्रातील जनतेला सांगतोय कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. युरोपात जास्त पेशंट मिळायला लागलेत. लसीचा दूसरा डोस घेतला पाहिजे. लोक पहिला घेतात आणि दूसरा घेण्याची गरज नाही म्हणतात. डब्ल्यूएचओनं सांगितलंय बुस्टर डोसची गरज नाही.मुख्यमंत्री आणि प्रशासन यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतोय”