कॉपीचे प्रकार न थांबल्यास राज्याचे वाटोळे होईल; सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन याविरोधात कडक भूमिका घ्यावी – अजित पवार

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी-मानुर (ता. पाथर्डी) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्या-काठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली. ते परीक्षा केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना घडली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात असे कॉपीचे आणि पेपरफुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार न थांबल्यास राज्याचे वाटाळे होईल. सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन या विरोधात कडक भूमिका घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
पाथर्डीतील या घटनेबरोबरच जालन्यात परीक्षेदरम्यान जिल्हा परीषद शाळा, सेवली या केंद्रावर आमच्या पाल्यांना कॉपी करू द्या अन्यथा तुम्हाला जीवे मारू अशा धमक्या केंद्र संचालक व पर्यावेक्षक यांना देण्यात आल्या.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेच्यावेळी सामूहिक कॉपी, पेपरफुटी सारखे प्रकार वारंवार घडत आहेत. असे प्रकार घडल्यास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. राज्याची शैक्षणिक क्षेत्रात पिछेहाट होऊन राज्याचे वाटोळे होईल. तरी या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घ्यावी, असे अजित पवार म्हणाले.