कंगनाचं पुन्हा वादग्रस्त विधान! एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते!

मुंबई: बॉलिवूडची पंगा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य, बेधडक बोलणं, यामुळे चर्चेचा विषय बनत असते. कंगना रणौतनं सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टनं आता सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. आता कंगना रणौतनं महात्मा गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
कंगना रणौत म्हणाली की, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना त्यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं म्हणत अहिंसेची खिल्ली उडवली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामला काही पोस्ट शेअर केल्या असून आपले हिरो निवडताना विचार करा असा सल्ला दिला आहे. तसंच महात्मा गांधींना सत्तेची भूक होती असंही म्हटलं आहे.
कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ‘गांधी आणि इतर नेताजींना सोपवण्यास तयार झाले होते’ अशी या बातमीची हेडलाइन आहे. या रिपोर्टमध्ये महात्मा गांधींसोबत जवाहरलाल नेहरु तसंच मोहम्मद अली जिन्ना यांनी एका ब्रिटीश न्यायाधीशांसोबत सुभाषचंद्र बोस देशात आल्यानंतर त्यांना सोपवण्यात येईल असा करार केल्याचा दावा आहे.
‘तुम्ही गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक, तुम्ही दोन्ही भूमिका घेऊ शकत नाही. निवडा आणि निर्णय घ्या’ असं या बातमीवर लिहिण्यात आलं आहे.स्वातंत्र्यसैनिकांना त्या लोकांनी ब्रिटीशांच्या हवाली केलं ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नव्हती, मात्र सत्तेची भूक होती असंही कंगनाने म्हटलं आहे. पुढे बोलताना कंगनाने महात्मा गांधींवर निशाणा साधत म्हटलं आहे की, “हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. आपले हिरो हुशारीने निवडा”.