लोकमान्य टिळकांचं ‘ते’ वाक्य कंगनाला तंतोतंत लागू पडतं – संजय राऊत

मुंबई: “भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने एका कार्यक्रमात केले. यावरून कंगना राणावत आणि भाजपावर टीका केली जात आहे. “कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने थोडी जरी लाज लज्जा असेल तर देशाची माफी मागावी.
एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात असं एकदा टिळक म्हणाले होते. अभिनेत्री कंगना रानौतला हे वक्तव्य तंतोतंत लागू पडते, अशी खोचक टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 1947 साली भारताला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले, असे वक्तव्य कंगना रानौतने केले होते. कंगनाबेनच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचा इतका भयंकर अपमान कधीच कोणी केला नव्हता. कंगनाने भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळ्यांवरच अफू-गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवले आहे. या वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाला सर्वोच्च अशा नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, हे देशाचे दुर्दैव असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.
रक्त, घाम, अश्रू आणि त्यागातून मिळालेल्या आमच्या स्वातंत्र्याला भीक असे संबोधणे हे राष्ट्रद्रोहाचेच प्रकरण आहे. अशा व्यक्तीस पद्मश्री पुरस्कार देशाचे राष्ट्रपती देतात. त्या सोहळ्यास पंतप्रधान मोदी उपस्थित असतात आणि स्वातंत्र्यास भीकेची उपमा देणाऱ्या कंगनाबेनचे डोळे भरुन कौतुक करतात. भाजपला स्वातंत्र्य आणि क्रांतिकारांच्या बलिदानाची थोडी जरी चाड असेल तर राष्ट्रद्रोही वक्तव्याबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजेत, असे शिवसेनेने म्हटले आहे.