विक्रम गोखले वडिलांच्या स्थानी असून विचार करूनच बोलले असतील – अवधुत गुप्ते
मुंबई: भारताला स्वातंत्र्य भीकमध्ये मिळाले असं वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही तिच्या विधानाचं समर्थन केलं. आता गायक अवधुत गुप्तेनं सुद्धा विक्रम गोखले वडिलांच्या स्थानी असल्याचं सांगत समर्थन केलं आहे.
विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दिल्याने ते वादात सापडले आहेत. अशात त्यांनी जो कंगनाला पाठिंबा दिला त्यासंदर्भात आज ते सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहेत. आज सकाळी 11 वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे. विक्रम गोखलेंनी केलेल्या वक्तव्यावर टीकेची झोड उठली आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
तर अभिनेता अतुल कुलकर्णीने एका ओळीचं ट्विट केलं आहे ज्याचा संबंध थेट विक्रम गोखलेंशी जोडला जातो आहे. अशात संगीतकार, गायक आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी विक्रम गोखलेंच्या म्हणणं योग्य असल्याचं नमूद केलं आहे. अवधूत गुप्तेंना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘विक्रम गोखले मोठे कलाकार आहेत. ते केवळ कलाकार म्हणून मर्यादित नाहीत. विक्रमजी विचारवंत आहेत. त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे. ते आमच्या वडिलांच्या स्थानी आहेत. आम्ही त्यांचा खूप आदर करतो. विक्रमजी जे काही बोलले असतील ते विचार करूनच बोलले असतील. त्यांनी व्यक्त केलेले मत पूर्ण विचारांती असावं. त्यावर प्रतिक्रिया देण्याइतकी माझी पात्रता नाही.’ असं अवधूत गुप्तेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं अवधूत गुप्तेंनी टाळलं.