दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा शानदार विजय, मालिका २-० ने जिंकली

मुंबई: रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात झालेल्या दुसऱ्या टी-20 लढतीत टीम इंडियाने न्यूझीलंडवर 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाकडून सलामीवीर खेळाडू केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकीय खेळी केली.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 154 धावांचा पाठलाग करण्यासाठी राहुल आणि रोहित ही जोडी मैदानात उतरली. दोघांनी 13.2 षटकात 117 धावांची सलामी दिली. अर्धशतकानंतर फटकेबाजी करण्याच्या नादात राहुल 65 धावांवर बाद झाला. यानंतर रोहित शर्मा याने अर्धशतक ठोकत 55 धावा केल्या. अखेर रिषभ पंतने नाबाद 12 धावा आणि व्यंकटेश अय्यर याने नाबाद 12 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 153 धावा केल्या. ग्लेन फिलिम्स याने सर्वाधिक 34 धावा केल्या. गप्तील आणि मिशेलने प्रत्येकी 31, तर चॅम्पमॅन याने 21 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या हर्षल पटेल याने सर्वाधिक दोन बळी घेतले, तर भुवनेश्वर, चहर, अक्षर पटले आणि अश्विनने प्रत्येकी एक बळी घेतला.