न्यूझीलंड विश्वचषकात अजिंक्यच! भारताचा वर्ल्डकपमधील पुढील प्रवास खडतर

4

मुंबई: टी-२० विश्वचषकातील सुपर १२ मधील दुसऱ्या गटातील सामन्यात न्यूझीलंडने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे भारताचा विश्वचषकातील पुढील प्रवास खडतर बनला आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी अतिमहत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि फिरकीपटू ईश सोधी यांच्या माऱ्यासमोर भारताच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचा २० षटकात ७ बाद ११० धावांत खुर्दा केला.

भारताने दिलेलं १११ धावांचं आव्हान न्यूझलंडने २ गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केलं. सलामीवीर मार्टीन गुप्टील आणि डॅरियेल मिचेलने न्यूझलंडच्या डावाची सुरुवात केली. बुमराहने गुप्टीलला बाद करत न्यूझलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन मैदानात आला. त्याने मिचेलच्या मदतीने विजय सुकर केला. मिचेलने चांगली फलंदाजी करत संघाला सहज विजय मिळवून देण्यात मोलाचा हातभार सलावला.

त्याने ३५ चेंडूत ४९ धावा केल्या. यामध्ये चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. मिचेलचं अर्धशतक एका धावेने हुकलं. त्याला बुमराहने केएल राहुलकरवी झेलबाद केलं. भारताकडून फक्त बुमराहने चांगली गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात १९ धावा देत २ गडी बाद केले.

दरम्यान, केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. भारताने नियमित सलामीवीरांपेक्षा वेगळा प्रयत्न म्हणून इशान किशन आणि केएल राहुल या जोडीला सलामीला पाठवलं. पण न्यूझीलंडने भारताचा प्रयोग अयशस्वी ठरवला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने इशानला (४) स्वस्तात तंबूत धाडलं. तर पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात टीम साउदीने राहुलला झेलबाद केले. राहुलने ३ चौकारांसह १८ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये भारताला फक्त २ बाद ३५ धावा करता आल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेला रोहित शर्मा आणि कप्तान विराट कोहलीला संघाला सावरण्याची गरज होती, पण ईश सोधीने दोघांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं.

त्यानंतर ऋषभ पंतही (१२) माघारी परतला. संथ खेळणारा हार्दिकही (२३) १९ व्या षटकात माघारी परतला. शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने ११ धावा कुटल्यामुळे भारताला शंभरीपार पोहोचता आले. डावाच्या शेवटच्या षटकात भारताने शतक पूर्ण केले. या षटकात भारताने ११ धावा काढल्या. २० षटकात भारताने ७ बाद ११० धावा केल्या. भारतातर्फे रवींद्र जडेजाने सर्वाधिक २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून बोल्टने २० धावांत ३ तर सोधीने १७ धावांत २ बळी घेतले.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.