अजित पवार यांच्या कामाची स्टाईल मला फार आवडते ; नवाब मलिकांनी केले कौतुक
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांना चांगलेच अडचणीत आणले आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. या सर्व घडामोडींच्या पलीकडे जाऊन एका वृत्तपत्राने मलिक यांची मुलाखत घेतली.
‘अजित पवार कधीही थकत नाहीत. त्यांच्या कामाची स्टाईल मला फार आवडते. ते स्पष्टपणे बोलतात. त्यामुळे लोकांना ते वाईट वाटत असेल. त्यांनी आणखी मनमोकळं झालं पाहिजे, केवळ कामच करून चालत नाही. ते लोकांपर्यंतही पोहचवले पाहिजे. ‘प्यार में इजहार और राजनीति में प्रचार’ करायला हवा.’ असा सल्ला मलिक यांनी अजितदादांना दिला आहे.
प्रेम केलं नाही तर नातं टिकणार नाही आणि राजकारणात प्रचार केला नाही तर लोकांना आपण नेमके कोणते काम करीत आहे, हे समजणार नसल्याचे मलिक म्हणाले. त्यामुळे अजित पवार यांनी थोडं जास्त बोलायला हवं, असे मलिक म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काय सल्ला द्याल, या प्रश्नाचेही मलिक यांनी उत्तर दिले. फडणवीस माणसांशी संबंध व्यवस्थित ठेवतात. मात्र त्यांना माणसं नीट ओळखता येत नाहीत.
त्यांनी त्यांच्या आजूबाजूला उपरे गोळा करून ठेवले आहेत, असे मलिक म्हणाले आहेत. आपल्या आयुष्यातील आठवणींना उजाळा देताना मलिक म्हणाले की, कम पढा खर्चे जाए और जादा पढा तो घर से जाए… असे आमचे वडील म्हणत होते. त्यामुळे घरात शिक्षणासाठी तेवढं अनुकूल वातावरण नव्हतं. घरातून कॉलेज शिकणारा पहिला मीच होतो, अशी माहिती मलिक यांनी दिली. दरम्यान माझी बहीण १२ वी चांगल्या मार्काने पास झाली. त्यामुळे, तिला एमबीबीएसचे शिक्षण द्यायचे मी ठरवले . त्यासाठी, बंगळुरू युनिव्हर्सिटीच्या रमैय्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अशी माहिती मलिक यांनी मुलाखतीत दिली.