मोठी बातमी : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय केला जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात शरद पवारांनी आज हि घोषणा केली. प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त  होण्याचा निर्णय घेतला आहे, असे शरद पवार यांनी आज जाहीर केले. या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. पवारांनी निर्णय मागे घ्यावा असे सर्वच कार्यकर्त्यांना वाटत आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यावर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. यावर पवार म्हणाले कि निवृत्त होण्याचा निर्णय घेतला तरी मी पक्षात असणारच आहे, फक्त पदावर असणार नाही एवढंच म्हटलं आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. पवार साहेब निर्णय घेत असताना लोकशाही पद्धतीने चर्चा करून निर्णय घेतात. काही दिवसांपूर्वी साहेब म्हणाले होते कि, भाकरी फिरवायची हीच योग्य वेळ आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांना वाटलं होत कि पक्षात काही बदल होतील मात्र आज त्या वक्तव्याचा अर्थ उलगडला. आपण सगळ्यांनी साहेबांकडे पाहूनच काम केलं आहे. साहेबांच्या डोळ्यादेखत नवा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नाको? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

शरद पवार नेमकं काय म्हणाले ? 

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील १ मी १९६० पासून सुरु झालेला हा संपूर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे.  संसदेतील राज्यसभा सदस्य पदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधिक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही असे शरद पवार म्हणाले.