जे रिॲक्ट होत नाहीत त्यांना योग्य वेळी संधी मिळते’; पंकजाच्या त्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान

पुणे: फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल, पण पदासाठी हात फैलावणार नाही, असे विधान पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत केले. विधानपरिषदेवर संधी न दिल्यामुळे त्या असे बोलल्या असा कयास बांधण्यात येतोय. पंकजा मुंडे यांच्या याच नाराजीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय.

पंकजा मुंडेंबाबत चुकीचे अर्थ लावण्याचे कारण नाही. चंद्रशेखर बावनकुळेंना दोन वर्षानंतर मिळालं. संघटनेची जबाबदारी आम्ही जास्त महत्वाची मानतो. पंकजा आणि विनोदजींचही होईल या वर्षभरात. खूप स्कोप आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.

भाजप नेते विनोद तावडे आणि मी एकत्र काम केलंय. जेव्हा त्यांना तिकीट नाकारलं तेव्हा वेगळ्या चर्चा झाल्या. मात्र जे संयम ठेवतात रिॲक्ट होत नाहीत त्यांना चांगली संधी मिळते. पंकजा चांगल काम करतायेत. त्या प्रदेश कार्यकारीणीला उपस्थित होत्या. महाराष्ट्रातही त्यांचं लक्ष आहे. वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

याआधी एका सभेत बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली खदखद जाहीरपणे बोलून दाखवली. माझे माता-पिता माझे सर्वस्व तुम्ही आहात. तुम्हाला दहा परिक्रमा करेल, मला अजून कुठल्या परिक्रमेची आवश्यकता नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईल. पण कुणासमोर हात फैलावून कुठल्या पदाची मागणी करण्याची आमच्या रक्तात सवय नाहीये. एखादी संधी नाही मिळाली तर नाही. पण लोकांच्या सेवेची संधी सोडायची नाही ही शपथ गोपीनाथ मुंडे साहेबांना अग्नि देताना घेतली आहे. मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.