उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बाणेर परिसरातील पूरग्रस्त भागांची पाहणी
पुणे : काल पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोथरुडसह बाणेर, बालेवाडी, सोमेश्वरवाडी भागातील पूरग्रस्त भागांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच, पावसामुळे त्रस्त नागरीकांच्या समस्याही जाणून घेतल्या. या कठीण काळात आम्ही सर्व आपल्या पाठिशी खंबीर उभे आहोत, असे पाटील यांनी सांगितले. या भागातील नाल्यांना संरक्षक भिंत नसल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण असून पुणे महापालिकेने सर्वेक्षण करुन नाल्यांना संरक्षक भिंत उभारण्याचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले.
पाटील म्हणाले, शहरातील सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी आदी भागात नाल्यांना संरक्षक भिंत नसल्याने सोसायटी भाग आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याची बाब नागरिकांनी निदर्शनास आणून दिली आहे. भविष्यात पुरपरिस्थिती टाळण्याकरीता पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची रुंदी वाढविण्याबाबत सर्वेक्षण करावे. या कामी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पाटील म्हणाले.