सांगलीत भाजपचा सुफडा साफ; जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता

3

सांगली: सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने भाजपला धोबीपछाड दिला. 21 जागांपैकी चार जागांवर भाजपला विजय मिळाला. त्यामुळे बँकेतील सत्तेतून भाजप बाहेर फेकले गेले. दरम्यान, काँग्रेसचे जतमधील आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांना पराभव पत्करावा लागला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी काँग्रेसच्या आमदारांचा पराभव केला. तसेच भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख, संग्रामसिंह देशमुख आणि राहुल महाडिक यांनी विजय मिळवत जिल्हा बँकेतील भाजपचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला.

सांगली जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 21 संचालकांपैकी तीन संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. महाविकास आघाडीच्या पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजप निवडणुकीला कसे सामोरे जाणार, याविषयी उत्सुकता वाढली होती. मतदारांची पळवापळवी आणि चुरशीने प्रचार झाल्यानंतर 18 जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने १८ पैकी १४ जागा जिंकत भाजपला धोबीपछाड दिला.

काँग्रेसचे नेते आमदार मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील विजय झाले, तर काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांना मात्र जत सोसायटी गटातून पराभव पत्करावा लागला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी सावंत यांचा पराभव केला. जमदाडे यांच्यासह पतसंस्था गटातून भाजपचे राहुल महाडिक आणि औद्योगिक प्रक्रिया गटातून भाजपचे सत्यजित देशमुख, संग्रामसिंह देशमुख यांनी विजय मिळवत जिल्हा बँकेतील भाजपचे अस्तित्व राखण्याचा प्रयत्न केला. गेल्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित जिल्हा बँकेच्या सत्तेत होते.

राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलल्यानंतर सांगली जिल्हा बँकेतही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवली. त्यामुळे भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली महापालिकेनंतर जिल्हा बँकेतही भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 17 जागा जिंकत महाविकास आघाडीच्या पॅनेलने परिवर्तन घडवले, त्यामुळे महाविकास आघाडीच्या समर्थकांनी शहरात विजयाचा जल्लोष साजरा केला. तर चार जागांवर विजय मिळवल्याने भाजपच्याही समर्थकांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.