गणपती बाप्पा मोरया! लॉकडाऊननंतर प्रथमच अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायकाचे मंदिर उघडले, मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

मुंबई: लॉकडाऊननंतर प्रथमच अंगारकी संकष्टी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिर खुले करण्यात आले आहे, सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भक्त येत असल्याचे पहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून सिद्धिविनायकाचे मंदिर बंद होते. रात्री 1:30 वाजता दर्शनला सुरुवात झाली. आज सकाळी 7 वाजेपर्यंंत मंदिर भाविकांना दर्शनसाठी खुले राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती.

गेल्य दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्वच मंदिरे बंद होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर राज्यातील काही मंदिरे उघडण्यात आली मात्र, अद्यापही सिद्धिविनायक मंदिर बंद होते. त्यामुळे बाप्पाचे दर्शन घेता आले नाही. तब्बल दोन वर्षानंतर सिद्धिविनायकाचे दर्शन घेत आहे. कोरोनाच्या काळात सर्वजण अस्वस्थ झाले होते. आता कोरोनाचे संकट लवकरात लवकर जावो आणि सर्वांना आरोग्यपूर्ण जीवन लाभो, अशी सिद्धिविनायक चरणी प्रार्थना केल्याचे एका भक्ताने सांगीतले.

सिद्धिविनायक मंदिराच्या कार्यकारी अधिकारी नंदा राउत यांनी याबाब बोलताना  सांगितले की कोरोनाच्या नियमांचे पालन करून मंदिर खुले करण्यात आले आहे, भाविकांना ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे मंदिरात प्रवेश दिला जाईल, अडीच हजार भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनाला सोमवारी रात्री 1:30 वाजता  सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल.