देशभरात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त; ५० लाख बॅरल राखीव साठा सरकार करणार खुला, घोषणा लवकरच

मुंबई: देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट होणार आहे, असंही पेट्रोलियम तज्ज्ञ नरेंद्र तनेजा सांगतात. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमीच राहण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता वातावरण बदलू लागल्याचे तनेजा म्हणालेत. त्यामुळे आता त्याचे भाव वाढणार नसून कमी होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 85 डॉलरवरून 78 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरली. यावर तनेजा म्हणतात की, आता त्याची किंमत प्रति बॅरल 70 डॉलरपेक्षा कमी होण्याची वाट पाहत आहे. याची दोन प्रमुख कारणे त्यांनी दिली. नरेंद्र तनेजा यांच्या मते, या दोन मोठ्या कारणांपैकी सर्वात मोठे कारण म्हणजे नुकत्याच ग्लासगो येथे झालेल्या बैठकीत सर्व देशांच्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीबाबत चिंता व्यक्त करणे आणि त्याच बैठकीत भविष्यात इंधनाच्या पर्यायी वापरावर चर्चा होणे आहे.

इंधनाच्या महागड्या किमतींमुळे सर्वच देशांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इतर पर्याय निर्माण करण्याचा आग्रह धरला. हीच स्थिती राहिल्यास दुसरा पर्याय या देशांच्या कच्च्या तेलासाठी घातक ठरेल आणि अर्थातच व्यापारावरही परिणाम होणार असल्याचे तेल उत्पादक देशांना समजले. त्यामुळे त्यांनी हळूहळू तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चर्चेदरम्यान कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यास सांगितले होते, यासाठी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनाही या दिशेने पावले उचलण्याची विनंती केली होती.