आ देखें ज़रा किसमें कितना है दम; नवाब मलिक यांचं प्रवीण दरेकरांना ओपन चॅलेंज
मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. एक हजार कोटी रुपयांचा हा दावा दाखल करण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्याबाबतची माहिती दिली आहे. दरेकरांच्या या ट्विटला मलिक यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. आ देखें ज़रा किसमें कितना है दम, असं ओपन चॅलेंजच नवाब मलिक यांनी दिलं आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट करत हे चॅलेंज दिलं आहे. आ देखें ज़रा किसमें कितना है दम, असं मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये प्रवीण दरेकर यांनाही टॅग केलं आहे. प्रवीण दरेकर यांनी काल ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली होती. नवाब मलिक च्या विरोधात एक हजार कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यांनी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे, असं ट्विट दरेकर यांनी केलं आहे.
मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सत्तेच्या मुद्द्यावरून टोला लगावला आहे. चिड़िया चुग गई खेत अब पछताए का होय, सत्ता बिना रहा ना जाए !!!, असा चिमटा त्यांनी फडणवीसांना काढला आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईत क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी मलिक यांनी अनेक आरोप केले होते. त्यात त्यांनी मोहित कंबोज आणि त्यांच्या मेहुण्यावरही काही आरोप केले होते. या आरोपांमुळे माझी आणि माझ्या मेव्हण्याची बदनामी झाल्याचा दावा कंबोज यांनी करत मुंबईतील माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, क्रुझ पार्टी प्रकरणात तब्बल 20 जणांना एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्यात किंग खान शाहरुख खान यांचा मुलगा अरबाज खानचाही समावेश होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आर्यनला तब्बल 27 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.